मुंबई : नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो. नवदुर्गांचा महिमा अगाध आहे.त्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सव आपण करत असतो. यावर्षी 'श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेमार्फत आणि 'फ्रेम मी मीडिया' यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला.आनंदाची बाब म्हणजे, या अनोख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल टाटा-पॉवरच्या 'सहेली' गृप कडूनही घेण्यात आली.
या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावरती भर देऊन काम करण्यात आले आहे. स्त्रियांना देवी मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या 'कामाचा गौरव' आणि त्यांच्या 'कर्तुत्वाचा जागर' या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरुपात,नऊ वेगवेगळ्या भागात दाखविण्यात येणार आहेत.
याचे संगीत शिक्षिका 'योगिता तांबे' या निसर्गातून होणारा नाद आणि त्यांला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करीत आहे. विशेष म्हणजे त्या 70 हून अधिक पारंपरिक वाद्य वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्ण वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी आणि त्याच सोबत नववारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती सुद्धा जपत आहेत.
'माया शृंगारे' या आपल्या शेतात रानभाज्या जगवतात आणि त्याच संगोपन करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरुपी रानभाज्या मोफत देतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या आणि एक स्त्री असून दशक्रिया विधी करणाऱ्या श्रद्धा कदम या समाजसेवेचे कार्य करीत आहेत. निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून दगडांचे चित्रण करणाऱ्या 'श्रुतिका पालकर' या निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात.
आपल्या रुचकर हाताने भुकेलेल्यांची भूक भागवणाऱ्या नानी, म्हणजे 'नंदा गावडे' वय वर्षे 84 असणाऱ्या नानीं 'अन्नपूर्णा' म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजन आणि शारीरिक जडण-घडणीसाठी खेळल्या जाणाऱ्या आणि त्यातून आपली संस्कृती आणि परंपरा जपणार्या 'आरती परब'. आपल्या आयुष्याची कळ सोसत प्रेक्षकांना आदिवासी कला प्रकार 'कळसुत्री' आणि 'चित्रकथी' रूपातील बाहुल्यांचे खेळ करून मनोरंजन, समाज प्रबोधन आणि आपल्या 'ठाकर' वारसा जपणार्या 'तनुश्री गंगावणे'.
त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालवणाऱ्या आणि 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' हेच मूल्य अंगी बाळगून जगणाऱ्या 'श्रेया बिर्जे'. आपआपल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या नऊ रणरागिणीच्या कार्याला वेगळ्या नजरेनं बघत, त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी ही सिरीज करण्यात आली असून, त्याचे दिग्दर्शन 'सुमीत पाटील' व 'किशोर नाईक' यांनी सांभाळले आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव, यांनी सांभाळले आहे.
लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. ह्या कार्यात विशेष सहकार्य संकेत कुडाळकर, साक्षी खाड्ये,धीरज कादवडकर,मंगल राणे,अभिषेक तेंडुलकर,भरत शिंदे यांनी केले आहे. यातील विशेष बाब म्हणजे या सगळ्या स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी आपला आवाज दिला आहे. त्यात दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरुची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे चिन्मयी राघवन यांच्या समावेश आहे. पहिल्यांदाच अश्या प्रकारचा उपक्रम हा मराठी सोबतच इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होतोय.त्यामुळे महाराष्ट्रातील असामान्य,सबल स्त्रियाबद्दल माहिती पूर्ण जगापर्यंत पोहोचेल, हे निश्चितच.