कल्याण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन मुंबई शहरात नोकरीला जाणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर शहरात ये-जा करण्यास ८ मेपासून बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.
मुंबईत शासकीय आणि खाजगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी तसेच महापालिकेत काम करणारे कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेतर्फे आस्थापनांच्या जवळच्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईतील बँका, खाजगी कंपन्या आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही मुंबईत करावी, अशी सूचना कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी केली आहे. ८ मेपासून या दोन्ही क्षेत्रातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या लोकांना ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्तांनी कळवले आहे.
या दोन्ही महापालिका क्षेत्रातून मुंबईत कामासाठी ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती महापालिकेला ऑनलाईन कळवावी अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे.
कल्याण, डोंबिवली तसेच उल्हासनगर शहरांतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी प्रवास करतात. या शहरांमध्ये अशा काही कर्मचाऱ्यांमधूनच कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईतील कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर शहरात ये-जा करायला प्रतिबंध करण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबईतही अशा पद्धतीचे आदेश काढण्यात आल्याची चर्चा होती. मात्र असे कोणतेही आदेश नवी मुंबई शहरात काढण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिले आहे.
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरातून मुंबईत अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी म्हणजे पोलीस, नर्स, महापालिका कर्मचारी येत असतात. त्यांना प्रतिबंध केल्यास गोंधळ निर्माण होईल, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र लिहून कळवले आहे. सरकारने याबाबत खुलासा करावा, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.