मुंबई : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश केलाय... थेट परदेशातून किडनी विकण्यासाठी आलेल्यांना सहार पोलिसांनी अटक केलीय... या किडनी रॅकेटची पाळंमुळं देशभरात पसरली असून, अनेक व्हीव्हीआयपींचा त्यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
किडनी रॅकेटची पाळंमुळं आता थेट इजिप्तपर्यंत पोहोचलीयत... पैशांची गरज असलेल्यांना गरीबांना कमी पैशात किडनी विकायला भाग पाडायचं आणि किडनीची गरज असलेल्या धनाढ्यांना ती जास्त रकमेला विकायची, असं हे तस्करी रॅकेट.
जम्मू मधील व्यावसायिक अशोक महाजन, शिल्पा कोसला, पंजाबच्या पगवारा पालिकेचे महापौर अर्जुन खोसलांची कन्या, उत्तर प्रदेशातल्या आयटी व्यावसायिकाची पत्नी गरीमा जोशी, सध्या अमेरिकेत शिकणारा सूरतचा रहिवाशी हार्दिक पटेल आणि मुंबईच्या मालाड भागातला मोठा कार डीलर बिपीन चंद्रा... अशा बड्या धेंडांनी किडनी तस्करांकडून किडनी विकत घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती आलीय...
अशाप्रकारचं किडनी रॅकेट काही नवीन नाही... याआधी गुजरातच्या सूरत शहरात सर्वात मोठं किडनी रॅकेट उजेडात आलं होतं. त्याच प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी सुरेश प्रजापती यानंच आता थेट इजिप्तमधून नवं रॅकेट चालवायला सुरूवात केली होती. एअरपोर्ट पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर इजिप्तला फरार होण्याआधीच त्यांनी सुरेश प्रजापती आणि त्याचा साथीदार उर निजामोद्दीनला बेड्या ठोकल्या ...
सुरेश प्रजापती आधी श्रीलंकेतूही किडनी रॅकेट चालवायचा. तिथं बंदी आल्यानंतर आणि सुरेशला अटक झाल्यानंतर किडनी तस्करी बंद झाली. पण जामिनावर सुटताच त्यानं पुन्हा किडनी तस्करीचा गोरखधंदा सुरु केला.
पैशांची गरज असलेल्या व्यक्तीला हेरून हे त्याला किडनी विकायला भाग पाडायचे, त्यांचा इजिप्तमध्ये जाण्यायेण्याचा खर्च करायचे, शिवाय प्रत्येकाला ५ ते ७ लाख रुपये द्यायचे, सुरेश प्रजापती ही किडनी ३५ ते ५० लाख रुपयांना विकायचा, किडनी विकणारा हा किडनी विकत घेणा-याचा नातेवाईक असल्याची बोगस कागदपत्रं बनवली जायची, इजिप्तमधील नील बद्रवी हॉस्पिटलमध्ये किडनी काढण्याचं आणि प्रत्यारोपणाचं ऑपरेशन केलं जायचं...पण आता हा सगळा प्रकार मुंबई पोलिसांनी उघड केलाय...
(( पैशांची गरज असते आणि त्यामुळे किडनी विकली जाते हे कारण आता किडनी तस्करीत मागे पडत चाललंय ... कारण ऐशोआरामाकरता आणि सट्टेबाजीत कर्जाचा झालेला डोंगर दुर करण्याकरता किडनी विकली जात होती असं एअरपोर्ट पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या किडनी रॅकेट मधून समोर आलय... त्यामुळे पैशांकरता माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आलय ... ))