पुणे : तुम्ही राहत असलेला फ्लॅट भले तुमच्या मालकीचा असेल. पण ज्या इमारतीत तो फ्लॅट आहे, ती जागा कुणाच्या (FLAT OWNERS) मालकीची आहे? हे तुम्हाला माहितीय का. आता हा प्रश्न आम्ही का विचारतोय, असं तुम्हाला वाटत असेल.. त्यासाठी पाहा आमचा खास रिपोर्ट. (know how to transfer your flat land your name)
तुम्ही सध्या राहात असलेल्या फ्लॅटसाठी लाखो-करोडो मोजले असतील. मात्र ती बिल्डिंग ज्या जागेवर उभी आहे ती जागा मात्र तुमच्या मालकीची नाही. कारण राज्यातल्या एक कोटीपेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ १ लाख ६ हजार ४९६ संस्थांचीच जागेच्या मालकीची सहकार खात्याकडे नोंदणी झालेली आहे. त्यामुळे अजून ९९ लाखांपेक्षा जास्त सोसायट्यांची जागा बिल्डरांच्याच मालकीची आहे.
बिल्डरांना सोसायट्या आणि अपार्टमेंटची नोंदणी बंधनकारक असतानाही याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात येतं. आणि या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय. सोसायटीची जागा मालकीची करण्यावरून अनेकदा फ्लॅट मालक आणि बिल्डरमध्ये वाद होतात.उपनिबंधक कार्यालयातील अधिकारीही अशा नोंदणीसाठी उत्सुक नसल्याचीही तक्रार फ्लॅटधारक करत असतात.
मात्र या जागा मालकीच्या नोंदणीबाबत कायदा काय सांगतो ते पाहूयात.
मूळ जागेच्या सातबारा उता-यावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट १९६३ कायदा आहे. बिल्डरला पूर्ण बांधकाम आणि 60 टक्के फ्लॅट्सच्या विक्रीनंतर ४ महिन्यांत सोसायटीची नोंदणी करणं बंधनकारक आहे. बिल्डरनं टाळाटाळ केल्यास सोसायटीतील 11 फ्लॅट्समालक नोंदणीचा प्रस्ताव जिल्हा सहनिबंधकाकडे सादर करू शकतात.
आपण फ्लॅट विकत घेतला आणि तो नावावर झाला म्हणजे आपल्याला वाटतं की आता आपणच त्याचे मालक आहोत. मात्र त्याच्या खालची जमीन ही बिल्डरची असते याची आपल्याला जाणीवच नसते. पुनर्विकासाची वेळ येते तेव्हा बिल्डर आणि सोसायट्यांमध्ये याच मालकी हक्कावरून मोठा संघर्ष होतो. त्यामुळे आता जागे व्हा आणि आताच तुमच्या सोसायटीची जमीन नावावर करून घ्या.