मुंबई : कुर्लाच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतून ३० मार्च २०१९ रोजी बेपत्ता झालेल्या आरती रिथाडीया या मुलीचा शोध लागला. धक्कादायक बाब म्हणजे १० महिन्यापूर्वीच तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. टिळक नगर आणि चेंबूरच्या दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची नोंद वडाळा रेल्वे पोलिसात आढळली. विशेष म्हणजे बेपत्ता मुलीचा तपास नीट होत नसल्याने तिच्या वडिलांनेही आत्महत्या केली होती. या सर्व प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर आणि समन्वयावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
बेपत्ता झालेल्या आरती रिथाडीया मुलीचा पोलीस योग्य पद्धतीने शोध घेत नाही या निराशेतून वडील पांचाराम रिथाडीया यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. पांचाराम यांच्या अंत्ययात्रेत सहभागी जमावाने पोलिसांना मारहाण करीत पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मात्र या प्रकरणातील त्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
टिळक नगर ते चेंबूर दरम्यान या मुलीचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना सापडला होता. वडाळा लोहमार्ग पोलिसांना तिचा मृतदेह टिळक नगर आणि चेंबूर स्थानका दरम्यान आढळला होता. परंतु तिचे कोणीच वारस मिळत नसल्याने तीन महिन्यानंतर कायद्याने लोहमार्ग पोलिसांनी बेवारस म्हणून तिचे अंतिम संस्कार देखील केले होते. मात्र याची नोंद डीएनए सँपल आणि कपडे इत्यादी सायन येथील टिळक रुग्णालयात होते.
दरम्यान, आपल्या मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने अपहरण केले असल्याचा आरोप रिथाडीया कुटुंबाने केला होता. बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने पांचाराम रिथाडीया टिळकनगर येथे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती. जेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली तेव्हा या अंत्ययात्रेत पाच हजार पेक्षा जास्त जमाव सहभागी झाला होता.