मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा लालू प्रसाद यांना मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगी मीसा भारती, मुलगा तेजप्रताप आणि सून ऐश्वर्याही आहे. लालू यांची तब्बेत चांगली नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती, त्यांची मुलगी मीसा हिने दिली.लालूप्रसाद यांना आजाराने ग्रासलेय. ते आजाराशी सामना करत आहेत. एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. लालू यांना किडनी आणि डायबिटीज हे आजार आहेत. लालू यांना कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी लालूयादव यांच्यावर वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. लालूयादव यांच्यवर हृदय रोग तज्ज्ञ डॉ. पांड्या उपचार करणार आहेत. तीन वर्षांपूर्वी लालू यादव यांच्यावर बायपास सर्जरी त्यांनी केली होती.
मुंबईतील उपचारानंतर लालूयादव किडनीवरील उचारासाठी कर्नाटक राज्यातील बंगळुरुमध्ये जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. एम्स रुग्णालयाच्या रिर्पोटनुसार किडनी ६० टक्के निकामी झालेय. त्यांना हार्ट, बॅक पेन आदी आजार आहेत. यावर नंतर उपचार होणार आहेत, अशी माहिती आमदार भोला यादव यांनी दिली.
दरम्यान, पशुखाद्य गैरव्यवहारातील (चारा घोटाळा) चौथ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दोन दशकांपूर्वी डुमकाच्या कोशागारातून ३.७६ कोटी रुपये काढल्याचा आरोप लालूप्रसाद तसेच अन्य १८ जणांवर होता. १९९०च्या दशकात डुमका ट्रेझरीमधून गैरमार्गाने ३.१३ कोटी रुपये काढल्याप्रकरणी न्यायाधीशांनी लालू आणि इतर १७ जणांना दोषी ठरविले, तर मिश्रा आणि इतर ११ जणांची आरोपातून मुक्तता केली. सध्या लालू शिक्षा भोगत आहेत.
नोटबंदीच्या काळात सहकारी बॅंकेत दहा लाख रुपये जमा करण्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले. मागील दीड वर्षापासून या सहकारी बॅंकेची सीबीआय चौकशी सुरू आहे. अनेक खोट्या खातेदारांच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केल्याच्या आरोपावरून या बॅंकेची चौकशी सुरू आहे. याआधी राष्ट्रीय जनता दलाचे माजी विधान परिषद सदस्य अनवर महमद यांच्या मुलाला या प्रकरणात अटकही करण्यात आले होते.