मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली. या बैठकीला समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई कवाडे गट, शेकापचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकासआघाडीच्या सरकारला डाव्यांपासून समाजवादी पक्षापर्यंत सगळ्यांनी पाठिंबा दिला. आता शिवसेनेबरोबर बोलणी झाल्यानंतर राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतची पुढची चर्चा शिवसेनेबरोबर केली जातील. त्यानंतर पुढची पावलं टाकली जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकासआघाडीचा सत्ता फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. आज मुंबईत तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका असून त्यानंतर एक संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा आजच करणार का याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद बहाल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं देण्यात येतील. काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपद देण्यात येतील. तर विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्यानं आता मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत उद्धव ठाकरे बसणार का याकडेच साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय. 'झी २४ तास'ने बुधवारी संध्याकाळी सत्तेचा हा फॉर्म्युला सर्वात आधी दाखवला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.