मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस : मदतीसाठी इथे करा संपर्क, पालिकेचं आवाहन

मुंबईत पावसाची दमदार हजेरी... विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

Updated: Jul 27, 2019, 12:20 PM IST
मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस : मदतीसाठी इथे करा संपर्क, पालिकेचं आवाहन title=

मुंबई : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय. याचा फटका अनेक नागरिकांना बसतोय. जनजीवन थोड्या-फार प्रमाणात विस्कळीत झालंय. 

 

सकाळी १०.०० वाजता 

मुंबई : महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकल्यानं आजची तिरुपतीला जाणारी ही रेल्वे रद्द करण्यात आलीय... मुंबईवरून येणारी महालक्ष्मी ट्रेन तिरुपतीला जाते. ही रेल्वे सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास कोल्हापुरात पोहचणं अपेक्षित होतं.

सकाळी ८.३० वाजता 

बदलापूर : अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा दल आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा देत त्यांनी प्रवाशांसाठी बिस्कीट आणि पाण्याची सोय केलीय. 

 

अडकलेल्या 'महालक्ष्मी एक्सप्रेस'च्या प्रवाशांच्या मदतीसाठी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल दाखल
प्रवाशांच्या मदतीसाठी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल

 

मुंबई : नागरिकांनी मदतीसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ट्विट करून संपर्क करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं आवाहन

नाशिक : त्र्यंबकेश्वरलाही मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटे त्रंबकेश्वर गावात गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं दिसलं. अनेक ठिकाणी वाहनं पाण्यात अडकली होती मात्र सुरळीत बाहेर काढण्याचं काम सुरू आहे

सकाळी ८.१५ वाजता 

बदलापूर : 'महालक्ष्मी एक्स्प्रेस'मध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी 'एनडीआरएफ'ची टीम दाखल... जवळपास २००० प्रवासी रेल्वेत अडकून पडल्याचं समजतंय  

मुंबई : नागरिकांनी मदतीसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ट्विट करून संपर्क करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं आवाहन

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस खंडोभागात मुसळधार पावसाने थैमान घातलंय. शास्त्री खाडीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपेठेत पुराचे पाणी... खाडी किनाऱ्यालगतची भात शेती पाण्याखाली

सकाळी ८.०० वाजता

- उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

- बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस अजूनही बरसतोय... बदलापूरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली... अनेक गावांचा संपर्क तुटला... 

- महालक्ष्मी एक्सप्रेस रात्रभर बदलापूरला अडकून पडली आहे. पावसाचा जोर कायम असताना रेल्वेमध्ये पाणी शिरल्याची चिन्हं दिसत असल्यानं प्रवासी धास्तावले आहेत 

- मुंबईच्या पश्चिम उपनगरात मात्र पावसानं विश्रांती घेतलीय 

- रत्नागिरीतील खेड परिसरात पाणी साचलंय... त्यामुळे आज दिवसभर जनजीवन विस्कळीत राहण्याची चिन्हं आहेत

सकाळी ७.३० वाजता

- मुंबईत पावसाची दमदार हजेरी... विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग... शहरातील सखल भागात पाणी साचलं... परंतु, काही वेळापूर्वी पावसानं विश्रांती घेतल्यानं सकाळी ७.०० च्या सुमारास पाणी ओसरताना दिसतंय 

- कल्याणमध्ये मुसळधार पाऊस... कल्याण - मुरबाड रोडवर मुसळधार पावसामुळे चक्क पेट्रोल पंपावरच पाणी तुंबलय... या ठिकाणी आलेल्या सर्वच गाड्या पाण्याखाली आल्यात... जवळपास १५० लोकांनी पेट्रोल पंपाच्या गच्चीवर आसरा घेतलेला आहे... पाण्याची पातळी वाढताना दिसतेय 

- मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर... बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत... रस्ते वाहतुकीवरही परिणाम