मुंबई : काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. 'काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधानची मागणी होत आहे... मतं मिळवण्यासाठी काँग्रेसची बौद्धिकची दिवाळखोरी निघाली की काय? असा प्रश्न पडत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या तेव्हा त्या योजना देताना लाभार्थी हिंदू आहे की मुस्लीम, हे आम्ही विचारलं नाही. काँग्रेसने ५० वर्ष मुस्लिमांना फसवलं, असं म्हणत भाजपा हा केवळ हिंदूंचा पक्ष नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
'झी २४ तास'सोबत साधलेल्या विशेष संवादात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. पवारांवर वैयक्तिक आकस नसला, तरी त्यांचं राजकारण महाराष्ट्रानं नाकारलंय. शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत... राष्ट्रवादी हा पक्ष भ्रष्टाचारामुळे बदनाम झाला, असंही फडणवीस म्हणालेत. भाजपामधील नेतेपुत्रांच्या प्रवेशाबाबत बोलताना, भाजपा म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल बोलताना, पवार साहेब आता भाषण करताना रिटायरमेंटच्या भूमिकेत दिसतात. ते मोठे नेते आहेत पण आज दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणा... जनता त्यांच्यासोबत नाही... नेतृत्व त्यांच्याकडे द्यायला जनता तयार नाही' असं म्हणत फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. काही महिन्यांपूर्वीच मोदींनी शरद पवार यांची ओळख आपले 'गुरू' म्हणून करून दिली होती, याची आठवण करून दिल्यावर 'मोदीजी मुख्यमंत्री असताना शरद पवार हे कृषीमंत्री होते. तेव्हा ते गुजरात जायचे आणि तिकडे मदत करायचे. म्हणून मोदींनी त्यांच्याकडून शिकायला मिळालं असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.