मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुप्रिया सुळे वगळता इतर चार विद्यमान खासदारांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता होती. साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापूरातून धनंजय महाडिक यांना होणारा विरोध विचारात न घेता उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केल्याचे समजत आहे.
गोंदिया - भंडाऱ्यातून प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी लढण्यास तयार नसल्यानं मधुकर कुकडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. माढाच्या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी शक्यता आहे. बुलढाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे तर शिरुरमधून माजी आमदार विलास लांडेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताय. गेले काही दिवस पार्थ वेगवेगळ्या कार्यक्रमातून सहभाग घेत राजकीय प्रवेशाच्या हालचालींना वेग आलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. श्रीरंग बारणे शिवसेनेचे खासदार आहेत. जर पार्थ पवार यांची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा झाली तर मावळ लोकसभा निवडणुकीची लढत रंगतदार आणि प्रतिष्ठेची ठरेल. दरम्यान, शेकापशी युती असल्याने मावळमध्ये राष्ट्रवादीला ती फायदेशीर ठरू शकते.