युतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?

शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.

Updated: Jan 23, 2019, 09:20 PM IST
युतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं? title=

मुंबई : युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज गणेशपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि शिवसैनिक स्मारकास्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. शिवाजी पार्क इथल्या महापौर निवास इथे हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक भूमिगत बांधण्यात येणार आहे. 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकानिमित्त आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. हसत खेळत हा सोहळा पार पडला. पण शिवसेना-भाजप युतीचे काय, याचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला हस्तांतरित करण्याचा सोहळा झाला. खरं तर या दृश्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची व्यक्ती दिसणार होती, ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पण तसं घडलं नाही कारण शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेचं घोडे अजून अडले आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला. त्यापुढे जाऊन बाळासाहेबांचे स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले आहे. शिवसेनेकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असता तर या स्मारकाच्या गणेश पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्याची तयारी भाजपने ठेवली होती. भाजपने गेल्या महिन्यात बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टीशी जागा वाटप पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातही शिवसेनेबरोबर युतीची चर्चा लवकर पूर्ण व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका सुरूच आहे. भाजपशी युतीसंदर्भात कुठलीही चर्चा नाही, असे शिवसेनेचे नेते जाहीर सांगत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्वबळावर १२२ आमदार निवडून आले. मात्र पाच राज्यातल्या निकालांनी भाजपच्या नेत्यांना जमिनीवर आणले आहे. त्यामुळे भाजपसाठी राज्यात आता शिवसेनेचे महत्त्व पुन्हा वाढले आहे.