रत्नागिरी : मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे नवनियुक्त अध्यक्ष उदय सामंत यांनी दिलीय. तसंच जे बिल्डर लॉटरीतील विजेत्यांना त्यांचं घर दाखवण्यास नकार देतील त्यांच्यावर नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात म्हाडाच्या सदनिकाधारकांना घर पाहण्यासाठी दिले जात नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाचे विकासक आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना सदनिकाधारकांना तात्काळ घराचा ताबा द्या, अशी नोटीस काढल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. तसेच मालवणी येथे म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक बदल आपण केले आहेत. पुढील तीन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीत जागा उपल्बध झाल्यास त्याठिकाणी म्हाडाचा प्रकल्प उभारु तसेच चिपळूण येथील म्हाडाचा प्रलंबित प्रकल्पही लवकरच मार्गी लावू असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ज्या घरांच्या किमंती २० ते २५ लाख आहे. ती घरे १० लाखात कशी देता येतील यावर म्हाडाच्या तांत्रिक समितीने अभ्यास करावा, अशा सूचना देण्यात आल्या असून त्याचा अहवाल तीन महिन्यात देण्याचे बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.