महाविकासआघाडी सरकारबाबत पवार यांच्यानंतर संजय राऊत यांचे भाष्य

एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही आणि महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government ) चितपट करायला कुणाला जमणार नाही अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. 

Updated: Mar 17, 2021, 12:41 PM IST
महाविकासआघाडी सरकारबाबत पवार यांच्यानंतर संजय राऊत यांचे भाष्य title=
संग्रहित छाया

मुंबई : एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही आणि महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government ) चितपट करायला कुणाला जमणार नाही अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. मंत्र्यांच्या प्रगतीपुस्तकावर कुठला शेरा द्यायचा ते मुख्यमंत्री ठरवतील. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात मुख्यमंत्री सर्टीफिकेशन देतील, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच कारवाई करण्याचा छंद तपास यंत्रणांना जडल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनीही राज्यातील सरकार एका घटनेवर पडणार नाही. सरकार भक्कम आहे, असे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, महाआघाडीच्या मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहात सुरू आहे. अर्थसंकल्पात निधी मिळू शकला नाही हा काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे. त्याच बरोबर अनेक महामंडळांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. या सर्व विषयावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहेत. तसेच सचिन वाझे प्रकरणावरही चर्चेची शक्यता आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयंत पाटील, मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीधनंजय मुंडे,  मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित आहेत. 

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी सुमारे पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र चर्चेमधील तपशीलाविषयी कोणीही अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेले नाही.  तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी म्हटले होते, माझा विश्वास आहे की सचिन वाझे हा एक अतिशय प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहे. जिलेटिनच्या काड्या सापडल्याच्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली आहे. एक संशयास्पद मृत्यू देखील झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. कोणत्याही केंद्रीय संघाची गरज नव्हती.