दीपक भातुसे / मुंबई : सचिन वाझे प्रकरण (Sachin Waze case) आणि एनआयए (NIA) याप्रकरणाचा करत असलेला तपास याबाबत काल रात्री 'वर्षा'वर मॅरेथॉन बैठक पार पडली. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पार पडलेल्या या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.
सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार आणि पोलीस दलाची होत असलेली नाचक्की लक्षात घेता डॅमेज कंट्रोल कसं करायचं यावर चर्चा झाली. पोलीस दलात काही फेरबदल करता येतील का याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. त्यामुळे बैठकीनंतर आता सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्या सरकारी निवासस्थानी वर्षावर महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री 8 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत सुरु होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली. कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.