पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला.   

सायली पाटील | Updated: Dec 6, 2023, 07:57 AM IST
पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर title=
mahaparinirvan din pm Modi pays respects to Dr babasaheb ambedkar people gathered on chaityabhumi

Mahaparinirvan Din : 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारं एक व्यक्तिमत्त्वं अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा महामानवाला अभिवादन करत ते बाबासाहेबांच्या योगदानापुढं नतमस्तक झाले. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. 'भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. आज, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो', असं पंतप्रधानांनी म्हटलं. 

दादरच्या दिशेनं लाखो अनुयायी... 

मुंबईतील दादर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस आधीपासूनच अनुयायांनी जमण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोमवाकी रात्रीपासूनच या भागात एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. इथं होणारी अनुयायांची गर्दी पाहता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सर्वतोपरी तयारी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. 

हेसुद्धा वाचा : मुंबईच्या 'या' परिसरांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का? 

 

मुंबई पोलीस सुसज्ज... 

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईतील पोलीस यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या वतीनं दादर, शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त 250 पोलीस अधिकारी आणि 2 हजार पोलीस कर्मचारी, QRT, डॉग स्क्वाडसह बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाल्यामुळं त्याच्या नियोजनासाठी पोलिसांनी ही तयारी केल्याचं समतज आहे.