दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळून २ दिवस झाले, तरी अजून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झालेल्या नाहीत. शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपने अजून कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यास विलंब लागण्याची चिन्ह आहेत.
२०१४ साली ३१ ऑक्टोबरला भाजपच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी मात्र हा मुहूर्त चुकणार आहे. २०१४ला निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला होता, तर शिवसेना विरोधात होता. आता शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळात ५० टक्के वाटा मागीतल्यामुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे.
शिवसेनेने ही मागणी केल्यामुळे चर्चा दीर्घकाळ होण्याची शक्यताच जास्त आहे. यामुळे सत्ता स्थापनेस विलंब लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राजभवनावरही कोणत्याही पक्षाने संपर्क केला नसल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे.
जुनी विधानसभा बरखास्त व्हायचा ८ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरपर्यंत भाजप आणि शिवसेनेतल्या वाटाघाटी पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. याआधी २०१४साली राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजीनामा द्याला लागला होता. त्यामुळे राज्यात काही कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती.
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत.