मुंबई: संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या निवडणूक आयोग पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात घोषणा करेल. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होईल. आज सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक आहे. यानंतर निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
२००४, २००९ आणि २०१४ ची विधानसभा निवडणूक एका टप्प्यातच पार पडली होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात चार टप्प्यात मतदान झाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत किती टप्प्यात मतदान होणार याबाबत चर्चा सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक नुकतेच राज्यात पाहणी करून गेले. यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर न होता ईव्हीएमवरच होतील, असेही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले होते.
जर आज निवडणूक जाहीर झाली तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढीप्रमाणे असेल...
निवडणूक आयोग पत्रकार परिषद/आचारसंहिता - २० सप्टेंबर
अर्ज भरणे - २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर
अर्ज छाननी - १ ऑक्टोबर
अर्ज मागे घेणे - ३ ऑक्टोबर
मतदान - १९ ऑक्टोबर
मतमोजणी - २३ ऑक्टोबर
जर उद्या निवडणूक जाहीर झाली तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल...
निवडणूक आयोग पत्रकार परिषद/आचारसंहिता - २१ सप्टेंबर
अर्ज भरणे - २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर
अर्ज छाननी - २ ऑक्टोबर
अर्ज मागे घेणे - ४ ऑक्टोबर
मतदान - २० ऑक्टोबर
मतमोजणी - २४ ऑक्टोबर