Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

Maharashtra Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.  

Updated: Mar 9, 2023, 04:16 PM IST
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर title=

Maharashtra Budget 2023: सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा (Shinde-Fadanvis Government) पहिला अर्थसंकल्प (Budget 2023) आज राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला. फडणवीस यांनी पेपरलेस म्हणजे आयपॅडच्या माध्यमातून बजेट मांडलं.  महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला, विद्यार्थी, राज्यातील रस्ते, आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

महिलांसाठी मोठ्या घोषणा
राज्याच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्यायत. एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीटामध्ये सरसकट पन्नास टक्क्यांची सूट देण्यात आलीय. तसंच लेक लाडकी या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. त्या अंतर्गत ज्या कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड असेल अशा कुटुंबातल्या मुलींसाठी दरवर्षी ठराविक रक्कम जमा करुन मुलींना 18 व्या वर्षी 75 हजार देण्यात येणार आहेत.  अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांनी वाढ करण्यात आलीय. तसंच शहरांमध्ये नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. 

शेतकऱ्यांसाठी महासन्मान निधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केलीय. शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेची घोषणा करण्यात आलीय. या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. त्यामध्ये  राज्य सरकारनं 6 हजारांची भर घातलीय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता दर वर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. याचा 1 कोटी 15 लाख शेतक-यांना लाभ होणार आहे. 

सुजलाम सुफलाम होणार महाराष्ट्र
शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजनेची घोषणा करण्याबरोबरच प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या करण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. 'वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टी दिली जाईल. दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण केलं जाणार असून याचा 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ होणार आहे,' असं फडणवीस यांनी जाहीर केलं.

आरोग्य योजनेतील उपचार निधीत वाढ
आरोग्य विभागासाठी 3 हजार 520 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. तर आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला, तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. 

किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा
राज्यातील गड आणि किल्ले यांची अवस्था बिकट आहे. अनेक गड आणि किल्ल्यांचे बुरुज ढासळला आहे. आता किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे.

अंगनवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
राज्याच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांसाठी (Anaganwadi Sevika) मोठी तरतुद करण्यात आली आहे.  येत्या काही दिवसातच अंगणवाडी सेविकांची मोठी भरती करण्यात येणार आहे. यंदा एकूण 20 हजार रिक्त पदं (Recruitment) भरली जाणार आहेत. अंगणावाडी सेविकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.  मानधनात एकूण हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अंगणवाडी सेविकांच्या पगारात वाढ करण्यासाठी घोषणा केली आहे.

रेल्वे आणि मेट्रो प्रवास सुखकर होणार
यंदाच्या अर्थसंकल्पातून एकूण रेल्वेसाठी 13000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत या बजेटमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड (Kalyan Murbad Railway Marg) रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मेट्रोचे नवे प्रोजक्ट सुरु होणार आहेत. मुंबईत (Mumbai Metro) 337 कि.मी. मेट्रोचे जाळं विस्तारलं जाणार आहे.