३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत

महाराष्ट्रातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत.

Updated: May 28, 2020, 11:11 AM IST
३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी 31 मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्वपूर्ण सूचना दिल्या. 

महाराष्ट्रातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे, शंभर टक्के कॅशलेस उपचार, व इतर काही गोष्टी प्रभावी ठरताहेत. महाराष्ट्र यात देशात उदाहरण निर्माण करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
      
मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही सर्वच जण अतिशय तळमळीने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयतन करीत आहात पण माझ्या दृष्टीने आता आकडेवारीपेक्षा तुम्ही रुग्णांना काय सुविधा देत आहात, त्यांना कसे बरे करीत आहात, उपचारांचे कसे नियोजन केले आहे याला महत्व आहे. संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासावी, रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणी ही लक्ष्य केंद्रित (फोकस्ड) असावी .जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे खूप महत्वाचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. 
 
आपण लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठविणे अयोग्य आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, खूप काळजी घेऊनही स्थलांतरित व प्रवास करणाऱ्या लोकांमुळे रुग्ण संख्या वाढते आहे. ग्रामीण भागात देखील बेड्सची मागणी वाढते आहे. कालच आपण मान्सून पूर्व बैठक घेतली. पावसाळ्यातल्या साथ रोगांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होतेय. पुढच्या १० दिवसांत ऑनलाईन शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट सुरु करता येतो का हे पाहावे लागेल. काही चित्रपट व मालिका निर्माते यांना पावसाळ्यापूर्वी आपण ग्रीन झोन्स मध्ये बाह्य चित्रीकरण करू देऊ शकतो का तेही पाहावे लागेल. लॉकडाऊन सुरु करतांना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत त्याविषयी नागरिकांमध्ये स्पष्ट कल्पना पूर्वीपासून असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्या नाहीत तर परत लॉकडाऊन करावा लागेल याची कल्पना असणे गरजेचे आहे म्हणजे संभ्रम राहणार नाही. मुंबईत चेस दि व्हायरसची रणनीती परिणामकारक दिसू लागली आहे. तशीच ती राज्यात इतरत्रही राबविली गेली पाहिजे. खूप गांभीर्याने मोहीम घ्यावी लागेल. टास्क फोर्सने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वेही राज्यातील सर्व रुग्णालयांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  

याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील प्रतिकार शक्ती आपण कशी वाढवतो, रुग्णांना त्यादृष्टीने सुविधा कशा देतो ते महत्वाचे आहे असे सांगितले. निवासी डॉक्टर्सची मोठी फळी आज कोरोना लढाईत आघाडीवर आहेत. ते नवे डॉक्टर आहेत. त्यांची देखील खूप कलाजी घेणे गरजेचे आहे, त्यांना सर्व संरक्षण साधने पुरवली पाहिजे असेही ते म्हणाले. प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी १०४ हेल्पलाईन क्रमांक सुरु करीत असून रुग्णालये जास्त दर आकारत असतील तर नागरिकांना इथे तक्रार करता येईल असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या स्तरावरून अशा तक्रारींची दखल घ्यावी, त्यासाठी नोडल अधिकारी नेमावा . तसेच प्रत्येक रुग्णालयाने उपचारांच्या दरांचे फलक रुग्णालयाबाहेर लावणे गरजेचे आहे ते त्यांनी केले आहे का हे तपासणे गरजेचे आहे.रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स देखील आपण ताब्यात घेतले आहेत पण त्याप्रमाणे तिथे अंमलबजावणी होते का ते प्रत्यक्ष पहावे असे सांगितले.
.  
नॉन कोविड रोग विशेषत: स्वाईन फ्ल्यू, डेंगी च्या प्रमाणात देखील काही जिल्ह्यांत वाढ होत आहे त्यामुळे यासाठी देखील त्वरित उपचारांची गरज आहे. इंडियन मेडिकल असोशिएशनच्या चर्चेत आपण सांगितले आहे की कोणताही रुग्ण आल्यास त्याला उपचारअगोदर कोविड प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करता येत नाही. छोटी छोटी रुग्णालये जी विविध आजारांवर शत्रक्रिया करतात त्यांना कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करू नये अन्यथा इतर रोगांसाठी उपचाराला रुग्णालय शिल्लकच राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी पालिका उद्यापासून बेड्स आणि रुग्णवाहिका ऑनलाईन करत असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तसेच डॉक्टरांची देखील मोठी सोय होईल. चेस दि व्हायरस मोहीम आपण राबवीत आहोत. प्रत्येक एका पॉझिटीव्ह रूग्णामागे आपण दररोज किती संपर्क शोधतो हे काळजीपूर्वक तपासले जाते व लगेच किती जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले ते पाहिले जाते असे ते म्हणाले.