दक्षिण मुंबईत हॉटेलला मोठी आग, २५ डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये आग लागली आणि एकच पळापळ झाली.  

Updated: May 28, 2020, 08:04 AM IST
दक्षिण मुंबईत हॉटेलला मोठी आग, २५ डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
ANI Photo

मुंबई : दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये आग लागली आणि एकच पळापळ झाली. याच हॉटेलमध्ये २५ डॉक्टरांचा मुक्काम होता. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरु केले. दरम्यान, लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, हॉटेलमधील २५  सर्व डॉक्टरांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 

मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा थिएटरजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आगीचा भडका उडाला. त्यानंतर हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग भडकली. या हॉटेलमध्ये डॉक्टर्स वास्तव्याला असल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, डॉक्टरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने चिंता मिटली आहे. आगीत मोठे नुकसान झाले असून अनेक शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

काही मिनिटात सर्व २५ डॉक्टरांना  बाहेर काढण्यात आल्यानंतर आणखी कोण हॉटेलमध्ये अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे डॉक्टरांचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झालेत. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला.