'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा'

यंदा कोरोनाच्या संकटामुळे क्वारंटाईनचे नियम लक्षात घेऊन अनेक चाकरमनी अगोदरच कोकणातील आपल्या गावी जायला निघाले आहेत. 

Updated: Jul 20, 2020, 10:27 AM IST
'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा'

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे. 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे क्वारंटाईनचे नियम लक्षात घेऊन अनेक चाकरमनी अगोदरच कोकणातील आपल्या गावी जायला निघाले आहेत. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे बसमधून मर्यादित संख्येनेच प्रवासी नेता येतात. त्यामुळे एसटी आणि खासगी बसच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हाच मुद्दा मनसेने आता लावून धरला आहे. 

राज्य सरकार कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी बसेसची सोय करु शकत नसेल तर मनसे त्याची व्यवस्था करेल. राज्य सरकारने आम्हाला त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण चेकपोस्टवर मुंबईतून येणाऱ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या दोन दिवसांत २ हजार चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्हात दाखल झाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची चेकपोस्टवर नोंद केली जात आहे. केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित केला आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी व गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात असं नियम चाकरमान्यांना पाळावे लागणार आहेत.