मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसची देशातील एकंदर परिस्थिती पाहता आता या विषाणूवर नेमकं नियंत्रण केव्हा मिळणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. यातच कोरोनाबाधितांचा दिवसागणिक वाढणारा आकडा आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या डोकेदुखीस वाव देत आहे. पण, आयआयटी मुंबईकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात मात्र याबाबतची एक दिलासातदायक माहिती समोर आली आहे.
IIT Bombay च्या अहवालात नमूद केल्यानुसार सद्यपरिस्थिती पाहता, मुंबईत येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. तर, महाराष्ट्रात यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. दिल्लीमध्ये कोरोनाचं सध्याचं प्रमाण पाहता महिन्याभरात येथील परिस्थिती नियंत्रणात असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील अडीच महिन्यामध्ये गुजरातमध्येही कोरोनाजन्य परिस्थिती सुधारू शकते. तर, देशातील इतर भागांमध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं असं या अहवालातून सांगण्यात आलं आहे. लेविट्स मॅट्रिक्स फॉर्म्युलाच्या मदतीनं या अहवालातील माहितीचा तपशील मिळवण्यात आला आहे. कोरोनाच्या विळख्यात असणाऱ्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीसुद्धा ही माहिती अत्यंत दिलासादायक ठरत आहे.
आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी हा अहवाल दिला आहे. लेविट्स मॅट्रिक्सच्या सुत्राचा वापर करत यासंबंधीचं एक सादरीकरणही तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीला कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या आणि याआधीच्या दिवसांत झालेली मृतांची संख्या यांचा आधार घेत देशात केव्हापर्यंत कोरोना नियंत्रणात येऊ शकतो याची माहिती मिळवण्यात आली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आयआयटीचा हा अहवाल पाहिल्यास मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तर, मृत्यूदरही कमी झाला आहे. याच गतीनं जर कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत राहिलं आणि मृत्यूदरात घट होत राहिली तर पुढच्या दोन आठवड्यांत मुंबईतील कोरोना नियंत्रणा येऊ शकतो. असंच काहीसं चित्र महाराष्ट्रासमवेत इतरही राज्यांमध्ये पाहायला मिळेल. आम्ही आशा करतो, की या अहवालाला आम्ही लवकरच सिद्ध करुन दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
IIT Bombay च्या अहवालानुसार कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं आहे. पण, याचा अर्थ तो आपल्या जीवनातून पूर्णपणे नाहीसा झाला असा नाही. उलटपक्षी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि यामुळं मृत्यू होण्याचं घटणारं प्रमाण या आधारे कोरोनावर नियंत्रण मिळवलं जाण्याचा अंदाज या अहवालात नमूद करण्यात आला आहे. शिवाय अशाच पद्धतीनं सतर्कता राखल्यास कोरोनावर शक्य तितक्या लवकर नियंत्रण मिळवता येऊ शकतं ही बाबही यात नमूद करण्यात आली आहे.