सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार - अजित पवार

सारथीचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.  

Updated: Jul 9, 2020, 02:10 PM IST
 सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार - अजित पवार
संग्रहित छाया

मुंबई : सारथीचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. सारथी काही बंद होणार नाही. सारथीला आठ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेतील हवाच निघून गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सारथीबाबत चर्चा होती. सारथी बंद होणार, सारथीकडे महाविकास आघाडीचे लक्ष नाही, अशी सातत्याने टीका होत होती. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत जोरदार चर्चा झाली. सारथीबाबत राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला. सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरु करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन ही संस्था अधिक चर्चेत आली. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. तसेच आपण ओबीसी असल्याने मला टार्गेट करण्यात येत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. या बैठकिला छत्रपती संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत संस्थेच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी माहिती दिली. सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.