केंद्र आणि राज्यात पुन्हा संघर्ष पेटणार, पंतप्रधानांच्या बैठकीत राजेश टोपेंनी केली 'ही' मागणी

केंद्र आणि राज्यात संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Updated: Jan 13, 2022, 09:10 PM IST
केंद्र आणि राज्यात पुन्हा संघर्ष पेटणार, पंतप्रधानांच्या बैठकीत राजेश टोपेंनी केली 'ही' मागणी title=

Maharashtra Corona Update : देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज  सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. महाराष्ट्रातर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या.

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत सांगितलं. राज्याला 50 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कोव्हॅक्सिनची लसींची गरज असल्याचं टोपेंनी बैठकीत सांगितलं. मात्र सर्व राज्यांमध्ये लसींचा पुरेसा साठा असल्याचा दावा पंतप्रधानांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केला. त्यामुळे लसींवरून पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

गैरसमजातून काही जण लसीकरणाला विरोध करत आहेत, याबाबत केंद्राकडून काही नियमाववी करता येईल का? अशी विचारणाही टोपे यांनी याबैठकीत केली. तसंच अडीच लाख प्रकरणांमध्ये ७० टक्के डेल्टा आणि ३० टक्के ओमायक्रॉन आहे. यावरुन डेल्टा अजूनही प्रभावी आहे, असं निदर्शनास येतं. त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत अधिक सुस्पष्टता असावी अशी मागणीही केल्याचं टोपे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मार्गदर्शन
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. कठोर परिश्रम हाच एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे.  भारताची 130 कोटी जनता आपल्या प्रयत्नांनी कोरोनावर नक्कीच विजय मिळवू. ओमायक्रॉनबद्दल पूर्वी जी शंका होती ती आता हळूहळू दूर होत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने सामान्य लोकांना संक्रमित करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्वांनी सतर्क राहा, काळजी घ्या आणि घाबरू नका. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पीएम मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने ज्या प्रकारे पूर्वाभिमुख, सक्रिय आणि सामूहिक दृष्टिकोन स्वीकारला आहे, तोच यावेळीही विजयाचा मंत्र आहे. कोरोनाचा संसर्ग आपण जितका मर्यादित करू शकतो तितकी समस्या कमी होईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतात बनवलेली लस जगभरात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करत आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारताने 92 टक्के प्रौढ लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे. देशात दुसऱ्या डोसचे कव्हरेजही जवळपास ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 10 दिवसांच्या आत भारताने आपल्या सुमारे 3 कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले आहे. हे भारताची क्षमता दर्शवते, या आव्हानाला सामोरे जाण्याची आपली तयारी दर्शवते.