मनसे अजूनही बॅचलर, कोणत्याही युतीचा टच झालेला नाही- राज ठाकरे

मनसे सध्या 'रेडी टू मिंगल' स्टेटसमध्ये आहे का, तुम्ही भाजपशी युती करणार का?

Updated: Mar 1, 2020, 09:53 PM IST
मनसे अजूनही बॅचलर, कोणत्याही युतीचा टच झालेला नाही- राज ठाकरे title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अजून कोणत्याही युतीचा स्पर्श (टच) झालेला नाही. मनसे अजूनही बॅचलरच आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजप-मनसे युतीची शक्यता तुर्तास फेटाळून लावली आहे. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना मनसेच्या भविष्यातील वाटचालीविषयी प्रश्न विचारण्यात आला. मनसे सध्या 'रेडी टू मिंगल' स्टेटसमध्ये आहे का, तुम्ही भाजपशी युती करणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा राज यांनी हजरजबाबीपणा दाखवत म्हटले की, मनसेला अजून कोणत्याही युतीचा टच झालेला नाही. मनसे अजून बॅचलरच आहे.

' विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आनंद झाला होता, पण....'

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने नव्या मार्गावरून वाटचाल करायचे ठरवले होते. त्यासाठी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तेव्हापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आज सकाळी भाजप नेते आशिष शेलार यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. 

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, राज ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीच्या प्रयोगावरही टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी मला खूप आनंद झाला होता. कारण, जनतेने पक्षांतर केलेल्या बहुतांश नेत्यांना घरी बसवले. परंतु, यानंतर राज्यात झालेले राजकारण दुर्दैवी होते. एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची, सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे हे दुर्देवी वाटते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.