काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत  

राजीव कासले | Updated: Aug 30, 2024, 10:12 PM IST
काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तर मुंबईतल्या वांदे पूर्वचे झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या आमदारांनी पक्ष सोडला नसून त्यांची हकालपट्टी केल्याचं म्हटलं आहे. 

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली अशी चर्चा होती.  हिरामण खोसकर, शिरीष चौधरी, झिशान सिद्धीकी, सुलभा खोडके, जितेंश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे यांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. या आमदारांवर कारवाई करणार असल्याचंही काँग्रेसनं जाहीर केलं होतं. मात्र,कारवाई करण्याआधीच अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम केलाय. 

कोण आहेत जितेश अंतापूरकर?
जितेश अंतापूरकर अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. विधान परिषद निवडणुकीत विरोधात मतदान केल्याचा काँग्रेसला संशय आहे. काँग्रेसने कारवाई करण्याआधीच अंतापूरकर यांनी राजीनामा दिला आहे.

झिशान सिद्धीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर?
ग्रेस आमदार झिशान सिद्धकी (Zeeshan Siddique) यांनी  मुंबईत उघडपणे अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान रॅलीचं  जोरदार स्वागत करत राष्ट्रवादीशी जवळीक वाढवलीय. आमदार या नात्यानं मी त्यांचं स्वागत केलं आहे, असं झिशान यांनी सांगितलं असलं तरीही भाषण करताना त्यांची काँग्रेस विरोधातली आपली खदखद व्यक्त केलीय. तर दुसरीकडे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिशान सिद्धीकी यांचं कौतुक केलं होतं. काँग्रेसेचे माजी मंत्री बाबा सिद्धकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली . 

लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसमधून मिलिंद देवराही  बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेसमधलेच बडे नेते बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर आता जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसची साथ सोडलीय.. पाठोपाठ बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या आऊटगोईंग सुरु असल्याचं चित्र दिसतंय..