Maharashtra Politics : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत. सकाळपासून अजित पवारांचा कुठलाही नियोजित कार्यक्रम नव्हता. मात्र ते देवगिरीवरही नव्हते. त्यामुळे पडद्यामागे विस्तार आणि खातेवाटपाबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याचं बोलंल जातंय. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे देखील दवेगिरीवर दाखल झाले आहेत.
खातेवाटपाचा तिढा
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथविधी घेऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadanvis Government) कमालीची अस्वस्थता निर्माण झालीय. हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारीच सुटणार असल्याचं दिसतंय.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना लवकरच पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे. राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराच्या शपथ विधीची तयारी पूर्ण झाली असल्याची बोलले जात आहे. एवढेच नाही तर राजभवनातील दरबार हॉल शपथविधीसाठी सज्ज आसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार हे नक्की. तर विस्तार लवकरच होईल मात्र कधी ते सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलीय.
अर्थ खात्यावरुन नाराजी
अजित पवारांकडे अर्थखातं दिलं जाऊ नये असं प्रत्येकाचं मत आहे असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं सातत्याने बोललं जातंय. मात्र शिंदेगटाचे मित्रपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडूंनी थेट नाराजी बोलून दाखवलीय. तीन इंजिनचं सरकार मजबूत दिसत असलं तरी तीन तिघाडा काम बिघाडा म्हटल्याने सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. तर राष्ट्रवादीकडे वित्तखातं सांभाळण्याचा अनुभव आहे असं प्रत्युत्तर प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलं.
राष्ट्रवादी-शिंदे गटाता वाद?
सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरुन शिंदे गटात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वाद रंगण्याची चिन्हही दिसतायत. हा वाद रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन रंगू शकतो. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरेंचं नाव पालकमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आलंय. तेव्हा रायगडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
विरोधकांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथही घेतली.. बंगले आणि दालनांचं वाटपही करण्यात आलंय. मात्र अजूनही खातेवाटप झालेलं नाही. यावरुनच ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाने राज्य सरकारवर टीका केलीय.