Maharashtra Political News : शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाकडून 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असून, या माध्यमातून शहरातील विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला वाचा फोडण्यात येणार आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचा चेहरा असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी या विराट मोर्चाची हाक दिली असून, त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजेरी लावतील असा अंदाज आहे. पण, या मोर्चाआधीच विरोधी गटानंही तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला आता महायुती प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 'चोर मचाये शोर'चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहे. त्यामुळं आता मुंबईत मोर्चांचं राजकारण सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे.
भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली महायुतीचा आदित्य ठाकरेंच्या मोर्चा विरोधात प्रत्युत्तर मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी चार वाजता महायुतीच्या वतीने नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा काढला जाईल. जिथं ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करताना दिसेल.
मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाकरे गट ठाम असला तरीही या मोर्चासाठीच्या परवानगीबाबतच बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत. सुरवातीला मुंबई पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली होती. पण, आता मात्र मोर्चाला परवानगी देण्यात आली असून, मोर्चाचा मार्ग मात्र बदलण्यात आला आहे.
इथं मोर्चासाठी तयारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या अडचणी सातत्यानं वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृह विभागानं ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात केल्याचं पाहायला मिळालं. शिंदे- फडणवीस सरकारनं अतिशय मोठा निर्णय घेत ठाकरे गटाची सुरक्षा झेड प्लसवरून 'वाय' दर्जावर आणण्यात आली. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी असणारी सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली असून, उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट व्हॅनही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिथं सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय झालेला असतानाच दुसरीकडून ठाकरे आणि संजय राऊत यांच्या काही निटकवर्तीयांवर सध्या ईडी धाड टाकताना दिसत आहे. त्यामुळं एकंदरच राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.