Loksabha Elections : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सध्या अनेक पक्षांची जागावटापाची समीकरणं ठरू लागली आहेत. अशा या समीकरणांमध्ये मोठ्या पक्षांनी मित्रपक्षांना सोबत घेत जागा वाटपामध्ये आपलं पारडं जड कसं राहीस याचाच प्रयत्न सुरु केला आहे. किंबहुना जागावाटपाचं गणितही मांडल्याचं म्हटलं जात आहे. पण, यामध्ये काही बडे नेते मात्र नाराजीनाट्याला सामोरे जाताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील सध्याच्या मोठा पक्ष कोणता, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे भाजप. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या आणि महाराष्ट्रात भाजपसाठी महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस आंनी भाजपकडून 26 जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तिथं शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 13 खासदारांची उमेदवारी निश्चित झाली. पण, उरलेल्या 9 जागा अजित पवार गटाला देण्याबाबत मात्र शिंदे गटानं नकारात्मक सूर आळवल्याचं म्हटलं जात असल्यामुळं आता यावर अजित पवार यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महतत्वाचं ठरेल.
सूत्रांच्या माहितीनुसार आगामी निवडणुकांच्या धर्तीवर शिवसेना आणि भाजप युतीसाठी 23-25 असं गणित ठरलं होतं. आता त्यातच 9 जागा अजित पवार गटासाठी सोडल्या जाण्याचा प्रस्ताव पुढे आला. तिथं पवार गट राष्ट्रवादीत बंड करून शिंदे- भाजप सरकारमध्ये सामील झाला, राज्यात राजकीय दुफळी माजली आणि पुढं जे काही घडलं ते आपण सर्वांनीच पाहिलं खरं. पण, आता याच सोबतीनं आलेल्या पवार गटासाठी 9 जागा सोडण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटानं तयारी दाखवली नसल्याची चर्चा सुरु झाली आणि त्यामुळं राज्यातील महायुत्तीमध्ये माजलेली ही धुसफूस सर्वांसमक्ष येऊ शकते. इतकच नव्हे, जागा वाटपाच्या या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय समीकरणं बदलतात की काय, अशीच भीतीसुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून निवडणुकांपूर्वी 26-11-11 अशा फॉर्म्युलाची मागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता त्यावरच पुढील राजकीय डावपेच ठरतील हे नाकरता येणार नाही.
2024 हे वर्ष भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. इथं एनडीएमध्ये जागा वाटपाची गणितं समोर येण्यास सुरुवात झालेली असतानाच तिथं इंडिया आघाडीच मात्र याची काही चिन्हं नाहीत. त्य़ातच महायुतीमध्ये जागा वाटपावरुन वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. थोडक्यात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आता धुमश्चक्री पाहायला मिळणार हे नक्की.