उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार?

Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. माध्यमांशी बोलत असताना अयोध्या राम मंदिर हा स्वाभिमानाचा विषय आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

आकाश नेटके | Updated: Jan 7, 2024, 09:28 AM IST
उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार? title=

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणवारुनही मोठं राजकारण पेटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या दिवशी काय करणार यासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे.

उद्धव ठाकरे यांचा समावेश अशा नेत्यांमध्ये आहे ज्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. या सगळ्या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला ते काय करणार आहेत हे स्पष्ट केले. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंसह कुटुंब दादर शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. जेव्हा वाटेल तेव्हा अयोध्येला येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

ठाकरे गटातर्फे 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी उद्धव ठाकरे 22 जानेवारीला ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात उपस्थित राहणार असून गोदावरीच्या तीरावर महाआरती देखील करणार आहेत. तर 23 जानेवारीला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे नाशिकमध्ये शिबीर होणार आहे. तसेच त्याच रात्री अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.

"अयोध्या राम मंदिराचा अभिमान आणि स्वाभिमानाचा विषय आहे. बाबरी पाडल्यानंतर 25-30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल.  त्या दिवशी (22 जानेवारी) संध्याकाळी 6.30 वाजता आपण काळाराम मंदिरात जाऊ, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी आंदोलन केले होते. संध्याकाळी 7.30 वाजता आम्ही गोदावरी नदीच्या काठावर महाआरती करू,' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेले काळाराम मंदिर हे रामाला समर्पित आहे. काळ्या पाषाणापासून बनवलेल्या रामाच्या मूर्तीवरून मंदिराचे नाव पडले आहे. वनवासात भगवान राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत पंचवटीत राहिले होते असे मानले जाते.