Maharashtra Minister Baba Siddique Resignation : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपण तातडीने राजीनामा देत असल्याचे बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी आपण वेळ आल्यावर सांगू असे म्हटलं होतं. मात्र आता बाबा सिद्दीकी यांनी अचानक राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी हे पक्ष सोडणारे दुसरे मोठे काँग्रेस नेते आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. झिशान यांनी हा दावा फेटाळून लावला होता. तर बाबा सिद्दीकी यांनी वेळ आल्यावर भूमिका मांडणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता सिद्दीकी यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
"मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या गेलेल्याच बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो," असे बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीन वेळचे आमदार आहेत. सिद्दीकी हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. सुरुवातीला ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून पराभव झाला होता. बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये राजकारणापासून चित्रपट जगतातील सर्व बड्या व्यक्ती सहभागी होतात. बाबा सिद्दीकी यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी डॉक्टर आहे तर त्यांची पत्नी शाहजीन गृहिणी आहे.
तपास यंत्रणेच्या रडारावर
बाबा सिद्दीकी 2017 पासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. मे 2017 मध्ये, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने बाबा सिद्दीकींच्या विविध ठिकाणी शोध घेतला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने 2018 मध्ये त्यांची 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.