Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्तापालट होऊन अन् शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) एक वर्ष पूर्ण होत असताना बुधवारी भाजपची (BJP) कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली आहे. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. भाजपच्या मंत्र्यांना याबाबत यापूर्वीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा या बैठकीत मांडण्यात आला आहे. अशातच कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्याचे समोर आले आहे.
सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे फडणवीस यांनी आदेश दिल्याचे समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या पर्णकुटी बंगल्यात बुधवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा साडेनऊच्या सुमारास भाजपच्या या बैठकीला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतरत मंत्र्यांसोबत स्नेहभोजन देखील पार पडलं. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांची मुख्य उपस्थिती होती.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा. जर राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा. तसेच सरकारमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवा. काही निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. तसेच आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा," असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना दिला आहे.
भाजपचे मिशन 45 काय आहे?
महाराष्ट्रात लोकसभा 2024च्या निवडणुकांसाठी भाजपने 'मिशन 45' आखलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपने ठेवलं आहे. याचसाठी केंद्रातील काही मंत्र्यांनी राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात दौरे सुरु केले आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय नेतेही मिशन 45 ला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत.