भाकरी फिरवायची वेळ आली आहे, त्यामुळे आता... राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सूचक विधान

Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 27, 2023, 10:41 AM IST
भाकरी फिरवायची वेळ आली आहे, त्यामुळे आता... राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सूचक विधान title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) जोरदार चर्चेत आहे. अजित पवार (Ajit Pawar_ नॉट रिचेबल असण्यापासून महाविकास आघाडीच्या (MVA) भवितव्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानावरुन राष्ट्रवादी पक्षात नेमंक काय सुरुय याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकरी फिरवायची वेळ आलीय, विलंब करुन चालणार नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये मोठ्या बदलाचे संकेत शरद पवार यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईत बुधवारी युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद पवार बोलत होते. भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही. पक्षसंघटनेत याबाबत चर्चा केली जाईल, असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

"समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल, त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली आहे," असे शरद पवार म्हणाले.

"महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे. पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी  करायची ते ठरवा. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल," असेही शरद पवार म्हणाले.

कष्टकरी वर्गाचा शोध घ्यावा लागेल - शरद पवार

"मुंबईत कार्यकर्त्यांची कमी नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हाचा कष्टकरी वर्ग मोठा होता. आज तो कष्टकरी वर्ग दिसत नाही. गिरण्या जाऊन तिथे मोठमोठ्या इमारती दिसतात. या कष्टकरी वर्गाचा शोध घ्यावा लागेल. घाम गाळण्याची संधी त्याला देण्यासाठी चित्र तयार करावे लागेल. तो बदल करण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील," असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या राजकारण भाकरी फिरवण्याची वेळ - संजय राऊत

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य केले आहे. "त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी भूमिका मांडली असेल तर मी त्याविषयी बोलणं योग्य ठरणार नाही. पण भाकरी फिरवण्याची वेळ देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे," असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.