वाल्मिक जोशीसह सीमा आढे, झी मीडिया : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यात पुन्हा महायुतीतील (Mahayuti) धुसफूस चव्हाट्यावर आलीय. शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येतंय. शिवसेनेत बंड करण्यावेळी शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) अर्थ खात्यावर आगपाखड केली होती. आता परत शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अर्थ खातं टार्गेट करण्यात येतंय. शिंदे गटाचे नेते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' असल्याचं विधान केल्यानं चर्चांना उधाण आलंय.
गेल्या काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात, असं विधान केलं होतं.त्यावरूनही चांगलंच राजकारण तापलं होतं. आता दहा वेळा पाठवलेली फाईल परत आल्यानं गुलाबराव पाटलांनी संताप व्यक्त करत अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं असल्याचं विधान केलंय. गुलाबराव पाटलांच्या विधानानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलंय..
राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
अजित पवारांच्या अर्थ खात्यावर टीका करणाऱ्या गुलाबराव पाटलांना मंत्री छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. परमेश्वर सर्वांना बुद्धी देवो, अशा शब्दांत भुजबळांनी गुलाबराव पाटलांना चिमटा काढलाय. मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्यावर सडकून टीका केली होती. पाणी पुरवठा खात्याची फाईल तब्बल 10 वेळा परत आल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केलाय होता. महायुती एकत्र असल्याचं चित्र जनतेसमोर गेलं पाहिजे, अशी भूमिकाही भुजबळांनी मांडलीय.
विरोधकांकडूनही टीका
शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून सातत्यानं सुरू असलेल्या अजित पवारांच्या विरोधातील विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही निशाणा साधला. तर पाच वर्षांत निधी वाटपात मतभेद झाला एवढा मतभेद आतापर्यंत कधी झाला नसल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय. मविआच्याअडीच वर्षांच्या सरकारच्या काळात देखील अजित दादांविषयी तक्रार केली होती, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय..
विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत धुसफूस वाढली आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत असल्याचं शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या विधानावरून समोर येतंय.. त्यामुळे अजितदादा महायुतीत नकोसे झालेत का?, असा प्रश्न निर्माण झालाय..