शिवसेनेतून Outgoing सुरुच, आता शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात

अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिंदे गटाची वाट धरत असल्याची प्रतिक्रिया

Updated: Aug 22, 2022, 07:32 PM IST
शिवसेनेतून Outgoing सुरुच, आता शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात  title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) दारी पोहोचल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचं (Shinde Fadanvis Government) भविष्य नेमकं काय असणार या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यातच राहिलं. त्यातच आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांची धाकधुक वाढली आहे. 

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे सोपवणार का याचा निर्णय न्यायालयात होणार आहे.  सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला (Shivsena) आहे.

दरम्यान, शिवसेनेतून सुरु असलेली गळती काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्ये खिंडार पडलं आहे. माजी आमदार अशोक पाटील (Ashok Patil) यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनंतर अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुप मध्ये सुरू होती. 

भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचं अशोक पाटील यांनी सांगितलं. शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा जेव्हा शिवसैनिकांनी दिला त्यावेळी व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचं अशोक पाटील यांनी म्हटलंय. 

तसंच जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी असा इशाराही अशोक पाटील यांनी शिवसैनिकांना दिला आहे. आज शेकडो कार्यकर्त्यांसह अशोक पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.