मुंबई: राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु, अशा निश्चयाने नोकरीसाठी घराबाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. आपण मार्च महिन्यापासून राज्यात काळजी घेतली. ही काळजी घेतली नसती तर आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला असता. आतापर्यंतच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली गेली नसली तरी आपण कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अर्ध्यातच लॉकडाऊन उठवण्याचे परिणाम आपण पाहत आहोत. मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. त्यासाठी मला टीकेचे धनी व्हावे लागले तरी चालेल. समजा आपण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन उठवला तर कामाच्या ठिकाणी मजुरांमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता आहे. अगोदरच परराज्यातील मजूर गावी परतले आहे. त्यामुळे उर्वरित मजुरांमध्येही कोरोनाची साथ पसरल्यास रेड झोनमध्ये अघोषित लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी वर्तविली. त्यामुळे आपण टप्प्याटप्याने राज्यातील लॉकडाऊन उठवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील ५० हजार उद्योगधंदे सुरु
आपण राज्यातील ७० हजार उद्योगधंदे सुरु करायला परवानगी दिली आहे. यापैकी ५० हजार उद्योगांनी कामाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी पाच लाख लोक कामावर परतले आहेत. आगामी काळात बाहेरून येणाऱ्या उद्योगांसाठी आपण जमीन राखीव ठेवली आहे. प्रदूषण करायचे नाही, या एकमेव अटीवर नव्या उद्योगांना तातडीने राज्यात विनापरवाना कारखाने सुरु करता येतील. मात्र, रेड झोनमध्ये इतक्यात उद्योगधंदे सुरु करणे परवडण्यासारखे नाही.
स्थलांतरित मजुरांनी पायी चालत जाऊ नये, आम्ही तुम्हाला गावी सोडू
महाराष्ट्रातून पायी आपल्या गावांकडे चालत निघालेल्या स्थलांतरित मजुरांना उद्धव ठाकरे यांनी घाई न करण्याचे आवाहन केले. आम्ही तुम्हाला सुरक्षितपणे गावी सोडू. तुमच्यासाठी रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसनेही कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले जात आहे. या मजुरांकडून एकही पैसा घेतला जात नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.