महात्मा गांधी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत; होणार फेरचौकशी?

महात्मा गांधी यांच्य हत्येला आता अनेक वर्षे उलटून गेली. पण, या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका हे या चर्चेचे निमित्त ठरले आहे.

Updated: Oct 8, 2017, 03:16 PM IST
महात्मा गांधी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत; होणार फेरचौकशी? title=

मुंबई : महात्मा गांधी यांच्य हत्येला आता अनेक वर्षे उलटून गेली. पण, या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका हे या चर्चेचे निमित्त ठरले आहे.

पंकज फडणवीस यांनी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये तीन जणांचा समावेश होता आणि एका संघटनेनं ही हत्या घडवून आणली होती. त्यामुळे या खटल्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. गांधी हत्या प्रकरणाचा निकाल फार वर्षांपूर्वी लागला असल्यानं यातून फारसं काही हाती लागणार नाही, असं मत सुरूवातीला न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं. मात्र आपली ही निरीक्षणं माजी सॉलिसिटर जनरल असलेल्या शरन यांच्यावर बंधनकारक नसल्याचं खंडपीठानं नंतर स्पष्ट केले, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही या याचिकेबाबत मत व्यक्त केले आहे. सत्तर वर्षांपूर्वीचे कोणतेच साक्षीदार आता हयात नसल्याने हा तपास या आधी झालेल्या तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याइतकाच मर्यादीत राहू शकेल. त्यामुळे गांधी हत्येच्या फेर तपासातून नवीन काहीच निष्पन्न होणार नसल्याचं मत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

गांधी हत्येप्रकरणी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली होती. तर सावरकरांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानं गांधी हत्येच्या मुद्यावरुन नव्या चर्चा रंगणार आहेत. कदाचीत हा मुद्दा राजकारणातही येऊन नव्याने राजकीय चर्चांच्या फैरी घडण्याचीही शक्यता आहे.