मराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे

'मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही.'

Updated: Feb 27, 2020, 05:17 PM IST
मराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे title=
फोटो सौजन्य : CMO Twitter

मुंबई : मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही. केवळ एक दिवसच नाही तर आयुष्य मराठीमय व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विधानभवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 

मराठी जिंजाऊंचे संस्कार असलेली भाषा असून मराठीचं वाकडं करण्याची कुणाची हिंमत नसल्याचंही यावेळी ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अमेरिकेतला मराठी भाषेसंदर्भातला एक किस्साही सांगितला. 

मराठी भाषा दिनानिमित्त आज विधान भवनात मराठी भाषेचा जागर करण्यात आला. आज सकाळी विधान भवनात ग्रंथ दिंडी आणण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ग्रंथ दिंडी खांद्यावर वाहून आणली. त्यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित होते. 

त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन केले. विधान भवन प्रांगणात बारा बलुतेदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या बारा बलुतेदरांनी आपली कला इथे सादर केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या कलाकारीची पाहणी केली. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतंय. गाहा सत्तसई या मराठीतील जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीच्या आद्य काव्यसंग्रहाची ओळख करून देणारा कार्यक्रम मुंबईत पार पडला. 

दरम्यान, अधिवेशनात आज चौथ्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस करणारा ठराव मांडला जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हा ठराव मांडणार असून तो मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.