मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी विधीमंडळात मोठा गोंधळ पहायला मिळाला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेनप्रकरणी घणाघाती टीका केली आहे. फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी सभागृहात केली आहे.
विधिमंडळात मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचे जोरदार पडसाद उमटलेले दिसून आले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर टीका केली. हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, प्रचंड गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज १५ मिनिटे तहकूब करण्यात आले.
खाडीत भरती येण्याची वेळ असल्याने मनसुख हिरेन यांचे शव किनाऱ्यावर येणार नाही, असे मारेकऱ्यांना वाटले. मात्र, नेमक्या त्याच दिवशी मारेकऱ्यांच्या दुर्दैवाने खाडीत भरती (Hightide) न आल्याने हे शव किनाऱ्यावर आले, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.