मुंबई : मुंबईत पु्न्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. ठाण्यातील १६ भागांत कडक लॉकडाऊन केले आहेत. असं असताना आता मुंबईतही कडक निर्बंध करण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. मुंबईत कोरोनाचे नियम डावळले जात असल्याचं समोर येत आहे. असं असताना आता मुंबईत कडक लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली आहे. जिथं जिथं केसेस वाढतायत, त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी, इतर निर्बंध लादण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद करण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास मुंबईत अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, अशी माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असे अस्लम शेख म्हणाले.
राजधानी मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशीच रुग्णवाढ कायम राहिली तर आगामी काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशत: लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. (राज्यातील 'या' जिल्ह्यात १६ भागांत आजपासून कडक लॉकडाउन)
ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी रूग्णसंख्या वाढतीच राहीली आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.