'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे

'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'

Updated: Jan 23, 2020, 08:43 PM IST
'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ध्वजात बदल केला आहे. बदल हा नेहमी करायचा असतो. माझ्या मनात जसा झेंडा होता. तसा मी हा १४ वर्षानंतर आणला आहे. हाच खरा झेंडा आहे. त्यामुळे मी हिंदूही आहे आणि मराठीही. त्यामुळे जर यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.  मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी  यावेळी दिला. 

हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत.  मी हिंदू आहे. यात वाद नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झेंड्यावरुन शिवसेनेने डिवचले होते. याला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नाही, असे राज ठाकरे यांनी नाव न घेता हल्लाबोल केला.  

 दरम्यान, मी पहिल्या सभेतच सांगितले आहे, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत.  त्याचवेळी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून येणारे मुस्लिम आमचे नाहीत. त्यांना त्यांच्या देशात हाकलून द्या, असे राज म्हणाले. पाकिस्तानी आणि बांग्लादेशमधून आलेल्या घुसखोर मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. मोर्चाला उत्तर हे मोर्चानेच दिले जाईल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे मुंबईमध्ये आज पहिलं अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेची पुढची भूमिका स्पष्ट केली.

आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले. देशाशी प्रामाणिक मुसलमान आमचेच आहेत, कलामांना नाकारू शकत नाही, झहीर खानला नाकारू शकत नाही, जावेद अख्तरांना नाकारु शकत नाही. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते. जर कोणी आडवा जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आडवाच घालणार, असे राज म्हणालेत. 

राज ठाकरे यांच्या भाषणातील  ठळक मुद्दे :

- हा झेंडा म्हणजे महाराजांची राजमुद्रा, झेंडा कुठेही वेडावाकडा टाकू नका, निवडणुकीवेळी हा झेंडा वापरायचा नाही, पक्षाची निशाणी असलेला दुसरा झेंडा, राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे- राज ठाकरे

- मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जाईन, धर्मावर नख मारण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन. 

- पाकिस्तानी बांगलादेशी मुसलमानांना हाकलून द्या, आरती त्रास देत नाही, नमाज त्रास का देतो? मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजेत. 

-सीएए एनआरसीच्या आधी समझोता एक्स्प्रेस बंद करा, राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

- नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चर्चा होऊ शकेल, पण बाहेरुन आलेल्यांना का पोसायचं? ही लोकं कुठून आली, यांना कोण मदत करतंय? याची माहिती पोलिसांना आहे

- सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे 

- कलम ३७०वरुन मोदींचं अभिनंदन केलं, पोलिसांना ४८ तास मोकळे हात द्या, बघा काय करतात