डोंबिवलीत आठ मजली इमारतीला भीषण आग; संपूर्ण इमारतीने घेतला पेट

Dombivali Fire : डोंबिवलीत एका आठ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच संपूर्ण इमारतीने पेट घेतला असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आकाश नेटके | Updated: Jan 13, 2024, 02:42 PM IST
डोंबिवलीत आठ मजली इमारतीला भीषण आग; संपूर्ण इमारतीने घेतला पेट title=

Dombivali Fire : डोंबिवलीतून आगीची भीषण घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या पलावा इथल्या एका आठ मजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीमधील एका घराला आग लागल्यानंतर ती संपूर्ण इमारतीमध्ये पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

डोंबिवली जवळील खोनी पलावा येथील डाऊन टाऊन या आठ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती. त्यानंतर ती आग पसरत इमारतीच्या खालच्या मजल्यापर्यंत पोहोचली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यापर्यत लोकं राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इमारतीमधील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निमशन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कल्याण डोंबिवली महानगर अग्निशमन विभागाने ही माहिती दिली आहे.

रायगडमध्ये भरधाव डंपरची कारला धडक

रायगडमध्ये म्हाप्रळ - पंढरपूर रस्त्यावर आकले गावानजीक भरधाव डंपरने कारला धडक दिली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावरून निघालेले आमदार भरत गोगावले यांनी थांबून जखमींची विचारपूस आणि मदत केली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.