सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा

Updated: Nov 11, 2022, 09:58 PM IST
सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय title=

Epidemic diseases in Mumbai : पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा कारण मुंबईत (Mumbai) गोवर (Measles) साथीचा उद्रेक झालाय. गोवर आजाराला सर्वाधिक बळी पडतायत ती लहान बालकं. गोवंडीत (Govandi) 3 बालकांचा मृत्यू गोवरमुळे झाल्याचा संशय आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासून गोवरचा संसर्ग वाढलाय, आतापर्यंत मुंबईत 84 रुग्णांची नोद झालीय. देवनाग, गोवंडीत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. आरोग्य विभाग घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचं सर्वेक्षण करतोय. 

पालिकेची सर्वेक्षण मोहिम
मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असून गोवर संशयित तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे पालिकेने (BMC) घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम (Survey Campaign) हाती घेतली आहे. गोवंडी परिसर विभागात एकूण 69,218 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गोवंडीत घराघरापर्यंत पोहोचून गोवर प्रतिबंधक लसीकरणाची (Vaccination) मोहीम राबवली जात असून गुरुवारी 130 मुलांना गोवर प्रतिबंधक लस (Measles Vaccine) देण्यात आली. यामध्ये नऊ महिने आणि 16 महिन्यांची मुले आणि आठ गर्भवती स्त्रियांचाही समावेश आहे.

बालकांचं लसीकरण
सर्वेक्षण मोहिमेत जे रुग्ण सापडतील त्यांना जीवनसत्त्व 'अ'च्या गोळय़ा देण्यात येत आहेत. यासह रुग्णांची सर्व माहिती घेऊन जर लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण केले जात आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसंच नऊ महिने आणि १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे 10 टक्के बालके ही अर्धवट लसीकरण झालेली आणि 25 टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत.

गोवरची लक्षणं काय? (Symptoms of Measles)

- संसर्गजन्य आजार

- खोकल्यातून, शिंकण्यातून आजाराचा प्रसार

- संसर्गानंतर 10-12 दिवसांनी लक्षणं जाणवतात

- पुरळ, ताप, डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी वाहणं

- पाच वर्षांखालील मुलांमध्ये सर्वाधिक आढळतो

गोवरपासून वाचायचं असेल तर गोवर लसीकरण तातडीनं पूर्ण करा, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. लहान मुलांवर हा आजार सर्वाधिक झडप घालतो. त्यामुळेच पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा.