कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. ठाकरे गटातील (Thackeray Group) मोठे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थान भेट घेतली. त्यानतंर रविंद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदमदेखील उपस्थित होते.
चर्चा खऱ्या ठरल्या
गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत आधीपासूनच चर्चा रंगली होती. शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीबरोबर (NCP) युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्ला किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांना दिला होता. याआधी 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असं सांगण्यात आलं होतं.
त्याआधी सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलं होतं. किर्तीकर आजारी असल्याने त्यांची भेट घेतल्याचं बोललं गेलं. पण आता किर्तिकर यांनी स्वत: वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला.