महाविकास आघाडीत मतभेद? काय ठरलं मुख्यमंत्री आणि शरद पवारांमधल्या बैठकीत

महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरून मतभेद आणि नाराजी नाट्य?

Updated: Jun 29, 2021, 07:15 PM IST
महाविकास आघाडीत मतभेद? काय ठरलं मुख्यमंत्री आणि शरद पवारांमधल्या बैठकीत title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सव्वा तास झालेल्या चर्चेत महाविकास आघाडी समोर असलेल्या विविध मुद्यांवरील मतभेदांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यात महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांना या बैठकीत पूर्ण विराम देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीत आणि सरकारमध्ये समन्वय असावा या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. 

याआधी शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरून मतभेद आणि नाराजी नाट्य सुरू होते. त्यात प्रामुख्याने
- काँग्रेसचा स्वबळाचा नारा
- त्यावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी
- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा न करता त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती
- लोकांचा विरोध असूनही कडक केलेला लॉकडाऊन 

या सगळ्या मुद्यांवर महाविकास आघाडीत मतभेद आणि नाराजी होती. काल याच मुद्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांशीही चर्चा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास सव्वा तास या दोघांमध्ये या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. 

या सगळ्या मतभेदांनी नाराजीला पूर्णविराम देऊन समन्वयाने काम करण्यासंदर्भात या दोन नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनात महाविकास आघाडीत समन्वय असावा याबाबतही या भेटी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर महाविकास आघाडीतील मतभेद दूर होतील अशी शक्यता आहे.