BREAKING : अनंत करमुसे मारहाण प्रकरण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं

Updated: Oct 15, 2021, 07:20 AM IST
BREAKING : अनंत करमुसे मारहाण प्रकरण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक title=

मुंबई : आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका करण्यात आली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत: वर्तकनगर पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी अटक करवून घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ठाणे कोर्टात हजर केलं. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. ठाणे कोर्टाने आव्हाड त्यांना 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. (Anant Karmuse Case Latest Updates) 

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.

जितेंद्र आव्हाड यांच्या हकालपट्टीची मागणी करणार

जितेंद्र आव्हाड म्हणजे ठाकरे सरकारच्या माफिया सरकारचे गुंड आहेत, मंत्र्यांनी अनंत करमुसेचं अपहरण केलं आणि त्यांना मारहाण केली. पोलीस काहीच करत नव्हते, शेवटी कोर्टाने आम्हाला न्याय दिला, आज ठाणे पोलिसांना अटक करायला लावलं, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आम्ही राज्यपालांकडे मागणी करणार आहोत, अशा गुंड मंत्र्यांची हकालपट्टी करा, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?

घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर 5 एप्रिल 2020 ला रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि 15 ते 20 जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. याप्रकरणी तीन पोलिसांना अटक करण्यात आली होती.