मिरारोडमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; साधं जेवण दिलं म्हणून मॅनेजरची फावड्याने हत्या

कल्लूने या दोघांवर झोपेत असताना फावड्याने हल्ला करत त्यांची हत्या केली.

Updated: Jun 7, 2020, 12:07 PM IST
मिरारोडमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; साधं जेवण दिलं म्हणून मॅनेजरची फावड्याने हत्या title=

ठाणे: मिरारोडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांनी यश आले आहे. मात्र, या हत्याकांडामागचे कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला. हॉटेलचा मॅनेजर साधे जेवण देतो याचा राग आल्याने आरोपीने मॅनेजरसह आणखी एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले. या हत्याकांडानंतर आरोपी पुण्यात जाऊन लपून बसला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 
मिरारोडच्या एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी फॅमिली रेस्टाँरंट व बारच्या मालकाने ४ जून रोजी रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी पाचारण केले होते. यावेळी पोलिसांना बारमधील पाण्याच्या टाकीत दोन मृतदेह आढळून आले. हे मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमांच्या खुणाही होत्या. 

हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी बारमालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करायला सुरुवात केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. या चौकशीदरम्यान साऱ्या प्रकराचा उलगडा झाला.
शबरी बारमधील अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघून गेले होते. मॅनेजर हरीश शेट्टी याच्यासह नरेश पंडित आणि कल्लू यादव हे तिघेच बारमध्ये राहत होते.

मॅनेजर शेट्टी हा स्वतःसाठी हॉटेलमधून चांगले जेवण मागवत होता. मात्र, कल्लूला साधे ज‌ेवण देत असल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली होती. शेट्टी आणि पंडित यांनी कल्लूला मारहाणही केली होती. याच रागातून कल्लूने या दोघांवर झोपेत असताना फावड्याने हल्ला करत त्यांची हत्या केली. नंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून त्यांचे मोबाइल घेऊन कल्लू पळून गेला होता. ही घटना समोर आल्यानंतर मिरारोड परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके स्थापण्यात आली होती. आरोपी कल्लू पुण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पुण्यात धडकून त्याला अटक केली.