धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. 

Updated: Jun 7, 2020, 10:15 AM IST
धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी  RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई: राज्यातील कोरोनाचा Coronavirus हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आता आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली निरामय सेवा फाउंडेशन, सेवांकुर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तब्बल ५०० कार्यकर्ते कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. धारावीच्या कामराज इंग्लिश हायस्कूलमध्ये हे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. 

'...तर आरएसएसने प्रेतं उचलावीत', 'पीएफआय'वरून काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र

दरम्यान, धारावीत आता कोरोनाच्या प्रादुर्भावाला वेसण घालण्यात यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धारावीत दिवसाला कोरोनाचे ७० ते ९० नवे रुग्ण सापडत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांत धारावीतील नव्या रुग्णांचा आकडा २५ च्या पुढे गेलेला नाही. शनिवारी तर धारावीत केवळ १० नवे रुग्ण सापडले. याशिवाय, ३० मे नंतर धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आता हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

मुंबई महानगरपालिकेने धारावीतील अनेक वस्त्या सील केल्या. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. याशिवाय, आरोग्य यंत्रणेकडून धारावीतील लाखो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या सगळ्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आगामी काळात आणखी आक्रमकपणे उपाययोजना राबवल्या गेल्यास धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो.