मेघा कुचिक, झी मराठी, मुंबई : दहशतवादी विरोधी पथकाच्या (ATS) एका चुकीमुळे एका तरुणाला तब्बल दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. ATS च्या दाव्यानुसार एक युवकाकडे अंमली पदार्थ (Drugs) सापडले होते. त्यात कोकीन हा अमली पदार्थ देखील होता. मात्र केमिकल ऍनलिसिसच्या अहवालानुसार जप्त केलेला अंमली पदार्थ हा कोकीन नव्हताच. ज्या गोळ्या नायजेरिया युवकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या NDPS कायद्यांतर्गत येत नाहीत. ATS ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात टायपिंगची चूक होती.
मुंबईमध्ये एका नायजेरियन युवकाकडे संशयित गोळ्या आणि पावडर आढल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अंमली पदार्थ विकण्याची केस चालवण्यात आली. मात्र एटीएसने दाखल केलेल्या अहवालातील चुकीमुळे त्याला दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागल्याचं समोर आलं आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा निर्णय देत त्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर ही केस सुरु होती. या युवकाला 12 ऑगस्टपर्यंत किती नुकसान भरपाई द्यावी हे महाराष्ट्र सरकारने ठरवावे अन्यथा त्याला किती नुकसान भरपाई द्यायची ती रक्कम न्यायालय ठरवेल अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे.
कोणताही अपराध केलेला नसताना दीड वर्षे तुरुंगात काढल्यामुळे युवकाने नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका न्यायालयानत केली आहे.
युवकाला एटीएसने का अटक केली होती ?
एक नायजेरियन युवक पवईतील घोडबंदर रोडवर कोकिन आणि इतरही अमली पदार्थांच्या गोळ्या विकण्यासाठी आला असल्याची टीप ATS ला ऑक्टोबर 2020 मध्ये मिळाली होती. या माहितीनुसार एटीएसने सापळा रचत या युवकाला ताब्यात घेतलं होतं. एटीएसच्या म्हणण्यानुसार या युवकाकडे 116.19 ग्रॅम कोकिन, 40.73 ग्रॅम केसरी रंगाच्या गोळ्या आणि 4.41 ग्रॅम एक्सटेसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
या गोळ्या आणि पावडर जप्त केल्यानंतर केमिकल ऍनालिसिससाठी फॉरेंसिक लॅबमध्ये नमुने पाठवण्यात आले होते. दरम्यान केमिकल ऍनालिसिसच्या अहवालानुसार युवकाकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ना कोकिन आढळले ना की एक्सटेसी. उलट लिडोकॅन, टपेनडोल आणि कॅफिन असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
फॉरेंसिक लॅबच्या असिस्टंड डायरेक्टच्याने अहवालात नमूद केले आहे की, लिडोकॅन, टपेनडोल आणि कॅफिन हे एडीपीएस कायद्यांतर्गत येत नाही. हाच मुद्दा नायजेरियन वकिलांनी न्यायालयात मांडला आणि त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र खालील न्यायालयाने त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडले असल्याचे म्हणत त्याला तुरुंगातून न सोडण्याचा निकाल दिला होता. या निर्णयाला नायजेरियाच्या युवकाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.