अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आणि माहिम-सांगलीतल्या अनधिकृत मजारींवर हातोडा पडला. आता राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून इशारा दिला आहे

Updated: Mar 24, 2023, 09:28 PM IST
अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

MNS Aggressive : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) इशाऱ्यानंतर मुंबईच्या माहीम (Mumbai Mahim) आणि सांगलीतल्या (Sangli) अनधिकृत मजारींवर कारवाई करण्यात आली. तर नाशिकमध्ये कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कारवाईनंतर मनसेच्या (MNS) अधिकृत ट्विटर हँडलवर अशाप्रकारे 'राज इम्पॅक्ट' आणि 'उखाड दिया'च्या पोस्ट टाकण्यात आल्या. त्यानंतर आता मनसे राज्यभरातल्या अनधिकृत दर्ग्यांबाबत आक्रमक झालीय. मुंब्रा देवी रस्त्यावर काही दिवसांपासून अचानकपणे 7 ते 8 मशिदी अनधिकृतपणे उभ्या राहत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 15 दिवसांच्या आत सर्व बांधकामांवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे याठिकाणी गणपतीचं किंवा मारुतीचं मंदिर उभारेल असा इशारा देण्यात आलाय. 

नवी मुंबईत, पुण्यातही इशारा
पनवेल  (Panvel) इथल्या पारगाव टेकडीवर अनधिकृत दर्गा आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) विमानतळ या टेकडीवरुन दिसते त्याच ठिकाणी हा दर्गा आहे, त्यामुळे या दर्ग्यावर सिडकोनं (SIDCO) तातडीनं कारवाई करावी अन्यथा सिडकोविरोधात मोर्चा काढणार असा इशारा मनसेनं दिलाय. पुण्यातही (Pune) मनसे आक्रमक झालीय. पुण्येश्वर मंदिराच्या जमिनीवर दर्गा बनवण्यात आलाय असा आरोप मनसेनं केलाय. पुण्यात मनसेकडून पुण्येश्वर मुक्ती अभियान सुरु करण्यात आलंय. 

राज ठाकरेंनी मानले राज्य सरकारचे आभार
राज्य सरकारने कारवाई केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्र लिहित राज्य सरकारचे आभार मानले आहेत. "सस्नेह जय महाराष्ट्र! धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो," असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रा नमूद केलंय.

मनसेनं अनधिकृत मजारींविरोधात शड्डू ठोकलाय. राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत मजारी-दर्ग्यांची यादीच मनसेकडून देण्यात आलीय. आता प्रशासन या अनधिकृत जागांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र यानिमित्तानं इतर धर्मीयांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांचाही मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित झालाय त्यावरही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.